मंगळवार दिनांक २७ जुलै २०२१ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक गणपती देवस्थानापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची श्री गिरीजात्मजाच्या दर्शनाकरीता दिवसभर गर्दी होती. परंतु शासनाच्या निर्णयानुसार कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे, उपाध्यक्ष संजय ढेकणे व विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. मंदिर बंद असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शन घेतले. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री गिरीजात्मजास प्रार्थना करण्यात आली. कोरोनाच्या आजारामुळे व लॉकडाउन निर्बंध चालू असल्याने मंदिरे व धार्मिक स्थळे बंद आहे. परंतु दिवसभरात अहमदनगर, नाशिक, ठाणे व इतर ठिकाणांवरुन अनेक भाविकांनी श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे येवुन पहिल्या पायरीचे दर्शन घेतले. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.