राज्यातील कोरोना आजाराचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्याकरिता राज्यसरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धार्मिक स्थळे व मंदिरे गेले वर्षभर भाविकांकरिता पूर्णता बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाल्याने मंदिरे खुली करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार गुरुवार दि. ७ ऑक्टोबर रोजी अष्टविनायक गणपती पैकी एक असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मक गणपती चे मंदिर भाविकाकरिता खुले करण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले असले तरी त्याचे संकट अजून संपले नसल्याने राज्य सरकारने काही नियम व निर्बंध घालून मंदिरे खुली केली आहे. त्यानुसार देवस्थान ट्रस्टने सूचनांचे पालन करीत उपाययोजना केलेली आहे.तसेच विविध निर्बंध लावून मंदिर खुले करण्यात आले आहे. मंदिर खुले झाल्याने मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती तसेच सकाळी विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आली. स्थानिक लोकांना या निर्णयामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून त्यामुळे समस्त ग्रामस्थांनी सदरच्या निर्णयाचे स्वागत केले. दिवसभरात अहमदनगर, नाशिक, ठाणे व इतर ठिकाणांवरुन अनेक भाविकांनी श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे येवुन श्रींचे दर्शन घेतले. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.