श्री क्षेत्र लेण्याद्री येथे गणेश जयंतीनिमित्त श्रींचा जन्मोत्सव सोहळा उत्सावात
माघी श्री गणेश जयंतीनिमित्त अष्टविनायकापैकी एक गणपती असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी शुक्रवार दि.४ रोजी भाविकांची पहाटेपासून मोठी गर्दी होती. श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून देवस्थान ट्रस्टच्यावतीने शनिवार दि.२९ जानेवारी ते शनिवार दि.५ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लेण्याद्री परिसरात श्री गणेश जयंतीनिमित्त भव्य स्वरूपात यात्रा भरते. या यात्रेचे खास आकर्षण असलेल्या बैलगाडा शर्यती यावर्षी न भरल्यामुळे गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्यावतीने देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, विश्वस्त जयवंत डोके व जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुशशेठ आमले यांच्या हस्ते पहाटे ५.३० वाजता श्रींचा विधिवत अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्रींचे दर्शनासाठी भाविकाकरिता मंदिर खुले करण्यात आले. सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत मंदिरात ह भ प नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे किर्तन झाले. तसेच पारंपरिक पद्धतीने श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर भाविकांकरिता देवस्थानच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, कैलास लोखंडे, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, विजय वऱ्हाडी, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, भगवान हांडे, ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गिरीजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने व आधार ब्लड सेंटर, संगमनेर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये २९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ग्रामस्थांच्यावतीने देवाच्या मानाच्या बैलगाड्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. भोमेश्वर प्रसादिक भजनी मंडळ, आलमे यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. कोरोनाचे निर्बंधाचे पालन करून भावीकांचे दर्शन सुलभ व्हावे याकरिता गर्दीचे नियोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आले होते. तसेच भविकांकरिता विविध सेवासुविधा पुरविण्यात आल्या होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर, पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन आले होते. शनिवार दि.५ रोजी ह.भ.प. गणेश महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन होणार असुन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.