*संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची गर्दी*
सोमवार दि. २१ मार्च २०२२ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मज गणपतीस आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तिथीप्रमाणे शिवजयंती असल्याने दिवसभर दर्शनासाठी भाविकांची तसेच शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दिवसभरात हजारो भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई व विश्वस्त जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, भगवान हांडे व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दुपारी १२:०० वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.