Skip to content
Home » शनिवार दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी संकष्टी चतुर्थी

शनिवार दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी संकष्टी चतुर्थी

  • by
Girijatmaj Lenyadri Ganapati Ashtavinayak

निमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची गर्दी.

शनिवार दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मज गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे,जयवंत डोके, भगवान हांडे, देवस्थानचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरात सकाळी ६ वाजता, दुपारी १२:०० वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. तसेच भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या. शनिवार व रविवार सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ शिवेचीवाडी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर जुन्नर येथील प्रविण रामदास ताजणे या भाविकांचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे येथील प्रकाश काशिनाथ मलबारी यांनी कै.सौ.प्रमोदिनी प्रकाश मलबारी यांचे स्मरणार्थ देवस्थानास विकास कामांकरीता एक लाख एक रुपयाची देणगी दिली. जुन्नर येथील डॉ.गणेश विलास कुलकर्णी यांनी अन्नदानाकरीता एकवीस हजार एकशे एक रुपयाची देणगी दिली व आठ ग्रॅम सोन्याची अंगठी श्रींचे चरणी अर्पण केली. तसेच सावरगाव येथील ज्ञानेश्वर जनार्दन काचळे या भाविकाचा नवस पुर्ण झाल्याने चांदिची गणेश मुर्ती श्रींचे चरणी अर्पण केली. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.