Skip to content
Home » अंगारकी चतुर्थी दि. १० जानेवारी २०२३

अंगारकी चतुर्थी दि. १० जानेवारी २०२३

  • by
Girijatmaj Lenyadri Ganapati Ashtavinayak

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची गर्दी
मंगळवार दि.१० जानेवारी २०२३ रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मज गणपतीस आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. चालु वर्षातील प्रथम अंगारकी चतुर्थी असल्याने दिवसभरात हजारो भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतला. यानिमित्ताने लेण्याद्री परीसरास यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष संजय ढेकणे, विश्वस्त सदाशिव ताम्हाणे, कैलास लोखंडे व जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी देवस्थानचे सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, भगवान हांडे, देवस्थानचे पुजारी, कर्मचारी व गोळेगाव ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिरात सकाळी ६ वाजता, दुपारी १२:०० वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. अंगारकी चतुर्थीनिमित्त सोमवार दि.०९ जानेवारी २०२३ रोजी संत निरंकारी मिशन जुन्नर शाखा यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. आलेल्या भाविकांकरीता पिंपळगाव सिध्दनाथ येथील वसंत बापु खंडागळे व शिरोली येथील वसंत पांडुरंग शेरकर यांचेवतीने खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच येणेर येथील समीर तान्हाजी ढोले यांनी देवाचे नैवेद्याकरीता १५१ नग कलिंगड फळे दिली होती. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादीक भजनी मंडळ, शिवेचीवाडी यांचे भजन झाले. रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर खेड येथील मयुर सुरेश घुमटकर, जुन्नर येथील शुभम प्रमोद भुजबळ व जय गणेश ग्रुप यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.