*श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त लेण्याद्री येथे अखंड हरिनाम सप्ताह* अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथे माघी गणेश जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र लेण्याद्री येथे अखंड हरिनाम सप्ताह दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी पासून प्रारंभ होणार असून पहाटे काकडा, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरीकिर्तन व नंतर हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये ह भ प संतोष महाराज बढेकर, ह भ प शिवलीलाताई पाटील, ह भ प चंद्रकांत महाराज खळेकर, ह भ प शंकर महाराज शेवाळे, ह भ प सौ अनिताताई जाधव, ह भ प निलेश महाराज कोरडे, ह भ प नामदेव महाराज वाळके, ह भ प दत्ता महाराज दोन्हे, हभप पारस महाराज मुथ्था यांची कीर्तन सेवा होणार आहे. बुधवार दिनांक २५ जानेवारी रोजी ह भ प नामदेव महाराज वाळके यांचे सकाळी दहा वाजता मंदिरात श्री जन्माचे किर्तन होणार असून गुरुवार दिनांक २६ जानेवारी रोजी ह भ प पारस महाराज मुथ्था यांच्या कालाच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताह काळात गोळेगाव, माळवाडी नेतवड, कुमशेत, शिवेचीवाडी, गोद्रे, उदापूर, गणेशवाडी भजनी मंडळे यांचे हरिजागर होणार आहेत. दिनांक २५ जानेवारी रोजी गणेश जयंती निमित्त गोळेगाव ग्रामस्थांच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने दिनांक २२ जानेवारी रोजी भव्य आरोग्य शिबिराचे ही आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप करण्यात येणार आहे. रक्तातील सर्व तपासण्या, ईसीजी, मॅमोग्राफी, रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी, कर्करोग तपासणी, विशेषता महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाची तपासणी देखील या शिबिरात करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.