श्री क्षेत्र लेण्याद्री येथे मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
रविवार दिनांक १४ मे रोजी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजनही केले जाते. सामुदायिक विवाह सोहळ्यांमुळे समाजातील गरीब व गरजूंना आपल्या मुला मुलींचे विवाह थाटामाटात करता येतात. हे विवाह सोहळे समाजासाठी प्रेरणादायी असून सर्वसामान्यांना साठी उपयुक्त आहेत. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळे संपन्न होत असून यावर्षी देवस्थानच्या वतीने समाजातील गोरगरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील मुला मुलींसाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळानी घेतला व त्यानुसार यावर्षी देवस्थान ट्रस्टच्या वतीने भव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक १४ मे रोजी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे हा विवाह सोहळा पार पडला. यामध्ये एकूण १३ जोडपी विवाहबद्ध झाली. सदर विवाहाचा संपूर्ण खर्च देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. या विवाह सोहळ्यामध्ये मानपान देणे घेणे, डिजे वाजविणे, हुंडा घेणे देणे या अनिष्ट प्रथा बंद करण्यात आल्या त्यास सर्व कार्यमालकांनी चांगला प्रतिसाद दिला.सकाळी १०.३० वाजता देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, ज्येष्ठ विश्वस्त मच्छिंद्र शेटे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर व सदाशिव ताम्हणे या मान्यवरांच्या शुभहस्ते गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सुपारी फोडणे, साखरपुडा व टिळ्याच्या कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर ११:३० ते ०३:०० वाजेपर्यंत आलेल्या वऱ्हाडी मंडळींना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी ४.०० वाजता मंगलमय वातावरणात व मंगलअष्टकाचे मंगलमय सुरांत १३ विवाह संपन्न झाले. यावेळी वधु वरांना स्त्रीभृण हत्या मी करणार नाही व कोणाला करून देणार नाही अशी शपथ सर्वांच्या साक्षीने देण्यात आली. देवस्थानच्या वतीने आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. या विवाहप्रसंगी ह.भ.प.दर्शन महाराज कबाडी, माजी आमदार शरद दादा सोनवणे, भाजपा नेत्या आशाताई बुचके , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली शेठ खंडागळे, रायगडचे उपजिल्हा अधिकारी सुनीलजी थोरवे साहेब, लायन्स क्लब ऑफ नाशिकचे डिस्ट्रीक गव्हर्नर राजेश कोठावडे आदी मान्यवरांनी वधूवरांना शुभाशीर्वाद दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवस्थानचे सचिव शंकर ताम्हाणे यांनी केले तर देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे स्वागत करून आभार मानले. सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, प्रभाकर गडदे, विजय वऱ्हाडी, जयवंत डोके, भगवान हांडे, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई व इतर मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.