*लेण्याद्री येथे विविध वृक्षांची लागवड.*
श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून श्री क्षेत्र लेण्याद्री डोंगर सुशोभीकरण अभियान सुरू असून त्या अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि हरित श्री क्षेत्र लेण्याद्रीचा संकल्प देवस्थानचे विश्वस्त मंडळाने केलेला आहे. या उपक्रमाला विविध संस्थाचे तसेच व्यक्तींचे सहकार्य मिळत आहे. याच अनुषंगाने रविवार दि. ९ जुलै रोजी विविध वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री क्षेत्र लेण्याद्री हे डोंगरात व निसर्गाच्या सानिध्यात वसलेले तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक येत असतात. आलेल्या भाविक व पर्यटकांना अनेक सोयी सुविधा देवस्थान ट्रस्टच्या मार्फत पुरविल्या जातात तसेच देवस्थानच्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. आलेल्या भाविकांचे व पर्यटकांचे दर्शन सुलभ व सुखकर व्हावे यासाठी देवस्थान ट्रस्ट प्रयत्न करीत आहे. याकरिता जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री क्षेत्र लेण्याद्री डोंगर सुशोभीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. याद्वारे लेण्याद्री डोंगरची सुंदरता वाढविणे करता विविध उपक्रम राबविले जाणार असून यात येथील डोंगर उताराला ट्रस्टच्या माध्यमातून गणेश वन, औषधी वन,नक्षत्रवन, देवराई व दर्शनमार्गाच्या दुतर्फा विविध प्रकारच्या फुलझाडे व फळझाडे लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून रविवार दिनांक ९ जुलै रोजी लेण्याद्री डोंगर उताराला विविध झाडांची रोपे लागवड करण्यात आली. याकरिता आपला आवाज न्यूज चैनल चे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी 30 झाडांची रोपे भेट दिली. वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात जुन्नर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रतापराव सपकाळ साहेब यांचे हस्ते करण्यात आली.तसेच या अभियानात प्रतापराव सपकाळ,संतोष जाधव,जितेंद्र बिडवई, सागर ताजणे, पवन गाडेकर, अथर्व कबाडी, डॉ. अमोल पुंडे यांनी सहभाग घेवून प्रत्येकी एक हजार रुपये देणगी देऊन एक एका वृक्षाची पालनकर्ता म्हणून जबाबदारी स्वीकारली. यावेळी रोटरी क्लब जुन्नर चे अध्यक्ष डॉक्टर अमोल पुंडे आपला आवाज न्यूज चैनलचे निवासी संपादक पवन गाडेकर, धामणखेलचे सरपंच संतोष जाधव, विनायक कर्पे, ॲड. केतन पडवळ, चेतन शहा, भरत चिलप, संतोष कबाडी, सागर ताजणे, प्रकाश वनवे, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सचिव शंकर ताम्हाणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त गोविंद मेहेर,मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, जयवंत डोके कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई व देवस्थानचे कर्मचारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.आलेल्या सर्व मान्यवरांचे देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.