संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री गणेश महायागः
रविवार दि.०३ सप्टेंबर २०२३ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील ‘श्री गिरीजात्मज’ गणपतीचे हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले. रविवारचे सुट्टीमुळे दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्ताने श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्रावण मास व संकष्टी चतुर्थीनिमित्त देवस्थानचेवतीने श्री गणेश महायागचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष संजय ढेकणे, विश्वस्त सदाशिव ताम्हाणे, जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गिरिजात्मज गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरात सकाळी ६ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. तसेच भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या. श्रावण मास व रविवारचे सुट्टीमुळे भाविकांची व पर्यटकांची दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. देवस्थानचेवतीने श्रावण मास व संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गणेश महायागचे आयोजन करण्यात आले होते. यात १२१ यजमानानी सहभाग घेतला होता. त्यांस आवश्यक असलेले साहित्य व सुविधा देवस्थानचेवतीने पुरविण्यात आल्या होत्या. सकाळी ९ वाजता दिप प्रज्वलन व गणेश पुजनाने श्री गणेश महायागाची सुरुवात झाली. त्यानंतर विधीवत पुजा, होमहवन व महाआरती करण्यात आले. आलेल्या यजमानाचा सन्मान देवस्थानचे वतीने करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे,जयवंत डोके, नंदकुमार बिडवई, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई व देवस्थानचे कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गणेश महायागाकरीता गोळेगाव येथील श्री स्वामी समर्थ ढोल लेझीम पथकातील महिलांनी तसेच देवस्थानचे कर्मचार्यानी सहकार्य केले. श्री गणेश महायागाचे खिचडी महाप्रसादाकरीता आळेफाटा येथील विलास पांडुरंग भुजबळ यांनी रक्कम रुपये अकरा हजार रुपये देणगी दिली. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ शिवेचीवाडी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर गोळेगाव येथील चैतन्य सदाशिव शेटे यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच देवाचे नैवेद्यकरीता मुंबई येथील किरण भगवान ताम्हाणे यांनी ५१ डझन केळी दिली. संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.