श्री क्षेत्र लेण्याद्री डोंगरावर साकारणार ‘गणेश वन’
अष्टविनायकापैकी एक श्री गिरिजात्मज गणपतीचे स्थान असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्रीच्या डोंगरावर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत “गणेश वन” हा प्रकल्प साकारणारा असून त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसा शासन निर्णय देखील निघाला असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.
हा प्रकल्प साडेसात एकर मध्ये होणार असून त्यामध्ये गणपती बाप्पाला प्रिय असणाऱ्या एकवीस वनस्पतीं व त्यांचे उपयुक्त माहिती फलकांसह असलेले गणेश वन, नक्षत्रवन व औषधी वन साकारण्यात येणार असून संपूर्ण डोंगरावर देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच झाडांना पाणी देण्यासाठी स्वतंत्र ठिबक सिंचन व्यवस्था, जलसाठे, दगडी पदचारी मार्ग, विश्रांतीसाठी बैठक व्यवस्था, छोटे सांकव इत्यादी कामे होणार आहेत.
अष्टविनायकापैकी श्री क्षेत्र लेण्याद्री हे एकमेव देवस्थान डोंगरावर असून त्या ठिकाणी पूर्व ते पश्चिम अशा अठ्ठावीस लेण्या असून त्यातील सातव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये श्री गिरिजात्मज गणपतीचे स्थान आहे. त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्र शासनामार्फत गणेश वन हा प्रकल्प झाल्यानंतर लेण्याद्रीच्या सौंदर्यात आणखीन भर पडणार असून गणेश भक्तांसोबत अनेक पर्यटक देखील याठिकाणास भेटी देतील. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.