श्री लेण्याद्री गणपती देवस्थान, श्री गणेश जयंती उत्सवनिमित्त अखंड हरीनाम सप्ताह
अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र लेण्याद्री येथे अखंड हरिनाम सप्ताह बुधवार दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४ रोजी पासून प्रारंभ होणार असून पहाटे काकडा, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरीकिर्तन व नंतर हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये ह भ प सुनिल महाराज पवार, ह भ प रोहीणीताई परांजपे – माने, ह भ प गोरक्षनाथ महाराज देठे, ह भ प जयश्रीताई तिकांडे, ह भ प गोविंद महाराज गोरे, ह भ प संतोष महाराज पायगुडे, ह भ प नामदेव महाराज वाळके, ह भ प पारस महाराज मुथ्था, ह भ प गणेश महाराज शिंदे यांची कीर्तन सेवा होणार आहे. मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी ह भ प नामदेव महाराज वाळके यांचे सकाळी दहा वाजता मंदिरात श्री जन्माचे किर्तन होणार असून बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी ह भ प गणेश महाराज शिंदे यांच्या कालाच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताह काळात गोळेगाव, माळवाडी नेतवड, कुमशेत, शिवेचीवाडी, गोद्रे, उदापूर, गणेशवाडी भजनी मंडळे यांचे हरिजागर होणार आहेत. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त गोळेगाव ग्रामस्थांच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने दिनांक ११ फेब्रुवारी रोजी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तसेच रक्तातील सर्व तपासण्या, ईसीजी, मॅमोग्राफी, रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी, कर्करोग तपासणी देखील या शिबिरात करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.