शनिवार दिनांक २९ मे २०२१ रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त अष्टविनायक गणपती श्रीक्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणेशास केळीची व फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. सर्व केळी प्रसाद रुपाने येथील माकडांना देण्यात येणार आहे. चतुर्थीनिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी देवस्थानचे सेक्रेटरी जितेंद्र बिडवई व विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर नागरिकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मंदिर बंद असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शन घेतले. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी चतुर्थीनिमित्त श्री गिरीजात्मजास साकडे घालण्यात आले. कोरोनाच्या आजारामुळे व लॉकडाउन निर्बंध चालू असल्याने मंदिरे व धार्मिक स्थळे बंद आहे. मंदिरे बंद असल्याने भाविक नाहीत व भाविक नसल्याने माकडांना खाद्यपदार्थ मिळत नाहीत. यामुळे देवस्थान ट्रस्ट ने केलेल्या आहावनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर भाविकांच्या सहाय्याने माकडांना खाद्यपदार्थ पुरवले जात आहेत . अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.