Skip to content
Home » Shri Girijatmaj Lenyadri Ganapati

श्री गिरिजात्मज लेण्याद्री गणपती भाविकाकरिता खुले आहे

 

श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपती चे मंदिर भाविकाकरिता खुले आहे. गणपती मंदिर सकाळी ६ः०० ते रात्री ८ः३० पर्यंत भाविकांसाठी सुरु राहील.

संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची गर्दी
रविवार दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मज गणेशच्या दर्शनाकरीता भाविकांची गर्दी होती. चालु जानेवारी महिन्यात पुन्हा संकष्टी चतुर्थी आली असुन शनिवार व रविवारच्या या सलग सुट्टीमुळे दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करत दिवसभरात भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, मच्छिंद्रशेठ शेटे, प्रभाकर गडदे, जयवंत डोके, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक भक्त उपस्थित होते. त्यानंतर भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दुपारी १२:०० वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. सोशल डिस्टसिंग पालन, मास्क वापर व सॅनीटायझर वापर बंधनकारक करण्यात आले होते. देवस्थानचे वतीने दर्शनमार्गावर सॅनीटायझर स्टॅन्ड उभारण्यात आले होते. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.

संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री गिरिजात्मजास आकर्षक फुलांची सजावट
गुरुवार दि. ०३ डिसेंबर २०२० रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मज गणपतीस आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. कोरोना आजार व लॉकडाऊन नंतर प्रथमच संकष्टी चतुर्थी असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालनकरत दिवसभरात भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, मच्छिंद्रशेठ शेटे, प्रभाकर गडदे, जयवंत डोके, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक भक्त उपस्थित होते. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दुपारी १२:०० वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. कोरोना आजारा पासुन रक्षणाकरीता व भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. सोशल डिस्टसिंग पालन, मास्क वापर व सॅनीटायझर वापर बंधनकारक करण्यात आले होते. देवस्थानचे वतीने दर्शनमार्गावर सॅनीटायझर स्टॅन्ड उभारण्यात आले होते तसेच मुख्य गेटवर सर्व भाविकांचे तापमान तपासनी केली जात होती. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेत तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.

दिनांक १७.०३.२०२० रोजी श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट ने सर्व विश्वस्तांच्या मिटिंग मध्ये दिनांक १७.०३.२०२० पासून ३१.०३.२०२० पर्यंत श्री लेण्याद्री गणपती मंदिर दर्शनासाठी बंद करण्याचे ठरविले आहे. अंतरराष्ट्रीय स्थरावर कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्न आढळत आहे. प्रवासाद्वारे या विषाणूचा संसर्ग होत असल्यामुळे तसेच पर्यटनस्थळी व धार्मिक स्थळी कोणत्याही प्रकारच्या सहलीचे आयोजन करण्यास सक्त मनाई केलेली आहे. राज्यशासन व मा.जिल्हाधिकारी साहेब, यांच्या सुचनेनुसार सुरक्षिततेच्या कारणास्तव श्रीं चे मंदिर देव दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी यांची नोंद घ्यावी. अशी विनंती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आलेली आहे. तरी भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे ही विंनती
आपले नम्र:- श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, गोळेगाव.

 

माघ श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे विविध धार्मिक कार्यक्रम भाविकांची गर्दी.
मंगळवार दि. २८ जानेवारी २०२० रोजी माघ श्री गणेश जयंतीनिमित्त अष्टविनायक तिर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील गिरीजात्मजाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासुन मोठी गर्दी झाली होती. श्री गणेश जयंतीचे औचित्य साधुन देवस्थान ट्र्स्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त लेण्याद्री येथे मोठी यात्रा भरते. श्री क्षेत्र लेण्याद्री येथे सुमारे लाख ते दिड लाख भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त प्रभाकर जाधव यांचे हस्ते पहाटे ५.३० वाजता श्रींचा महाअभिषेक व महापुजा करण्यात आली. सकाळी १० ते १२ वाजे पर्यंत मंदिरात ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे देवजन्माचे किर्तन संपन्न झाले. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर भाविक भक्तांकरीता देवस्थान ट्रस्टचेवतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, विजय वर्‍हाडी, काशिनाथ लोखंडे, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे, गोळेगाव ग्रामस्थ व कर्मचारी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम चालु होते. माघ श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त देवस्थान ट्रस्टच्यावतीने बुधवार दि.२२ जानेवारी २०२० पासुन बुधवार दि.२९ जानेवारी २०२० पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. बुधवार दि.२९ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. श्रावण महाराज जगताप यांचे काल्याचे किर्तन होवुन अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. तसेच बैलगाडा शर्यत बंद झालेपासुन देवस्थानचे वतीने संगित भजन स्पर्धेचे आयोजन केली जाते. यात सुमारे २५ ते ३० भजन मंडळ सहभाग घेतात. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते तसेच भाविकांकरीता विविध सेवा सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. दिवसभर भाविक भक्ताची व पर्यटकांची मोठी गर्दी होती. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

Lenyadari Ganpati

श्री क्षेत्र लेण्याद्रित मोठ्या उत्साहात जन्मोत्सव.
सोमवार दि. ०२ सप्टेंबर २०१९ रोजी भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्त अष्टविनायक तिर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील गिरीजात्मजाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासुन मोठी गर्दी झाली होती. गणेश चतुर्थीचे औचित्य साधुन देवस्थान ट्र्स्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी सुमारे लाख ते दिड लाख भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ४ वाजता श्रींचा महाअभिषेक व महापुजा करण्यात आली. सकाळी १० ते १२ वाजे पर्यंत मंदिरात ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे देवजन्माचे किर्तन संपन्न झाले. पारंपारिक पद्धतीने श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर भाविक भक्तांकरीता देवस्थान ट्रस्टचेवतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे, गोळेगाव ग्रामस्थ व कर्मचारी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम चालु होते. याप्रसंगी देवस्थानास अतुल गणात्रा (मुंबई) या भाविकाकडून ३० हजार रुपयांची देणगी देण्यात आली. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते तसेच भाविकांकरीता विविध सेवा सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. दिवसभर भाविक भक्ताची व पर्यटकांची मोठी गर्दी होती. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
सोबत फोटो

 

श्री गिरिजात्मज लेण्याद्री गणपती हे अष्टविनायकातील एकमेव गणपतीचे मंदिर लेण्यांमध्ये कोरलेले आहे. लेण्याद्री बाबतची प्राचीन आख्यायिका अशी सांगितली जाते की, पांडव अज्ञातवासात असताना त्यंानी लेण्याद्री येथील लेणी एका रात्रीत कोरली. येथे पुर्व ते पश्‍चिम एकुण २८ लेणी आहेत. श्री. गिरीजात्मज गणेशाचे मंदिर सातव्या लेण्यामध्ये आहे. या लेणीमध्ये पार्वती मातेने बारा वर्षे पुत्र प्राप्तीसाठी तपश्‍चर्या केली. या बारा वर्षांच्या तपश्‍चर्येनंतर श्री गणेशजी स्वयंभू प्रकट झाले.

गिरीजा म्हणजेच माता पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा, म्हणून या गणरायाचे नांव श्री गिरीजात्मज असे पडले असावे. या डोंगराला पुर्णतः लेणी असल्याने लेण्याद्री असे संबोधले जाते. असा हा लेण्याद्रीचा गिरीजात्मज. लेण्याद्रीचे श्री गणेश मंदिर हे दक्षिणाभिमुख आहे.

या मंदिरासमोर दोन पाण्याची कुंड आहेत. तसेच २१ व्या लेण्यातही पाण्याचे कुंड आहे. त्यामध्ये वर्षभर पाणी राहते. वैशिष्टय म्हणजे साचलेले पाणी असुनही अतिशय स्वच्छ व निसर्गतः थंडगार पाणी या कुंडामध्ये बाराही महिने असते. हे थंडगार पाणी प्यायल्यानंतर भक्तगण तृप्त होतात. त्यामुळे लेण्याद्रीच्या ३३८ पायर्‍या चढुन गेल्यानंतरही भाविक भक्तांचा थकवा नाहिसा होतो.

श्री गिरीजात्मज गणेश मंदिरातील प्रवेशद्वारासमोर मोठे कोरीव खांब आहेत, त्यावर हत्ती, घोडे, सिंह हे प्राणी कोरलेले आहेत. तसेच इतर लेण्यांच्या प्रवेश द्वारासमोर ही कोरीव खांब आहेत. श्री गणपतीच्या गाभार्‍यासमोरील सभामंडपात एकुण १८ गुहा आहेत. या सर्व गुहा ७x१०x१० फुट लांब रूंद असून या सर्व गुहांमध्ये पुर्वी ऋषीमुनींनी तपःसाधना केल्याचे सांगितले जाते.
श्री गणेेश मंदिराशेजारील ६ व्या आणि १४ व्या लेणीमध्ये बौद्धस्तूप कोरलेले आहेत. या स्तुपास गोलघुमट या नावांनेही संबोधले जाते. या लेणीचा आकार आतल्याबाजुने वर्तुळाकार कोरीव काम केलेले आहे. या गोलाकारामुळे या लेणीमध्ये आवाजाचा प्रतिध्वनी ऐकु येतो. स्तुपाच्या सभोवताली आकर्षंक कोरीव खांब आहेत.

श्री गिरीजात्मज गणेश मंदिराचा सभामंडप ५८ ते ६० फुट रूंदीचा असून या सभामंडपाला कोठेही भिंतीचा अथवा खांबाचा आधार नाही. मंदिरामधील गाभार्‍याबाहेर कोरीवकाम केलेले खांब बाहेर आहेत. मंदिरातील ओवर्‍यांमध्ये पेशवेकालीन चित्रशैलीचा एक उत्कृष्ट असा नमुना असलेली श्री गुरूदत्तात्रय, शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला श्री गणेश, सारीपाट खेळणारा श्री बालगणेश अशी वेगवेगळी भक्तीचित्रे नैसर्गिक रंगात रंगविलेली आहेत.

पुर्वी या गणपतीची पूजा पाठीवर होते असा समज होता परंतु असे काही नसून पुर्वी प्रत्येक भाविक स्वहस्ते पुजा करून शेंदूर व तेल मुर्तीला लावत असे. त्यामुळे तो आकार बदलला कालांतराने हे शेंदूराचे थर आपोआप पडले व मुर्ती पुर्वीप्रमाणे पुन्हा दिसू लागली. म्हणजेच ही मुर्ती पाठमोरी नाही. येथील गणेशमुर्तीच्या डोळ्यांमध्ये माणिक आहेत. हा श्री गणेश डाव्या सोंडेचा आहे.
गणपती मंदिरा बाहेरील कुंडात बाराही महिने थंड पाणी असते.

तसेच २१ व्या लेण्यातही पाण्याचे मोठे कुंड आहे.
प्रत्येक लेण्यापर्यंत पोहोचेणे वाटेअभावी भाविकांना अवघड पडते.

श्रीक्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानास महाराष्ट्र शासनाकडून तिर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा जाहीर.

अष्टविनायक गणपती देवस्थानापैकी एक गणपती देवस्थान असणाऱ्या तसेच भक्तांचे नवस पूर्ण करणारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या व सह्याद्री पर्वत रांगेच्या लेण्यात वसलेल्या श्रीक्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानास, महाराष्ट्र शासनाकडून आज ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत तिर्थक्षेत्राचा वरिष्ठ ‘ब’ वर्ग दर्जा जाहीर करण्यात आला. या संदर्भातील प्रस्तावाची फाईल ३ महिन्यांपूर्वी मुंबईतील बांधकाम भवन येथे दाखल करण्यात आली होती. या पूर्वी देवस्थानास तिर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त होता. आता तो रद्द करून तिर्थक्षेत्राचा वरिष्ठ ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. ‘ब’ वर्ग जाहीर केल्याचा GR देवस्थानचे उपाध्यक्ष श्री. कैलासशेठ लोखंडे यांनी ग्रामविकास विभाग, मुंबई येथे स्विकारला. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष श्री.गोविंदराव मेहेर, सेक्रेटरी श्री. शंकरराव ताम्हाणे, खजिनदार श्री.सदाशिव ताम्हाणे व विश्वस्त श्री. संजय ढेकणे यांनी दिली.
बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मा.असिम गुप्ता साहेब व उपसचिव मा.मनोज जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली २६ जुलै रोजी, बांधकाम भवन, मुंबई येथे झालेल्या मिटिंग मध्ये सदर प्रस्तावास मान्यता देण्यात आली. श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे येणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी देवस्थाने विविध मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत तसेच समाज उपयोगी सामाजिक उपक्रम देवस्थानचे वतीने राबविले जातात. तिर्थक्षेत्राचा वरिष्ठ ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त असणाऱ्या देवस्थानांना विकासकामे करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या, ग्रामविकास विभागाकडून निधी दिला जातो. ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे श्रीक्षेत्र लेण्याद्रीच्या सर्वांगीण विकास होण्यास व विविध विकास कामांस चालना मिळण्यास खूप मोठी मदत होईल. श्रीक्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानास तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याबद्दल ग्रामीण विकास मंत्री मा. सौ. पंकजाताई मुंढे, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, ग्रामीण विकास राज्यमंत्री मा. श्री. दादाजी भुसे साहेब, खासदार मा. श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार मा.श्री. शरददादा सोनवणे, जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव साहेब, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब, जुन्नरचे मा. तहसीलदार साहेब, जुन्नर पंचायत समितीचे सभापती व गट विकास अधिकारी साहेब यांचे देवस्थानचे वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
गोळेगाव ग्रामपंचायतिचे सरपंच सौ. शारदाताई अनिल लोखंडे यांनी, लेण्याद्री देवस्थानला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळण्यासाठी ग्रामसभेचा ठराव मंजूर करून घेतला होता आणि देवस्थान ट्रस्टने सदर प्रस्तावाची फाईल तयार करून पुणे जिल्हा परिषद,पुणे मार्फत ग्रामीण विकास विभाग व बांधकाम भवन, मुंबई येथे दाखल केली होती. श्रीक्षेत्र लेण्याद्री देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला. याकामी मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे साहेब व महाराष्ट्र विधान भवनाचे उपसचिव राजेश तारवी साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले.