श्री क्षेत्र लेण्याद्री येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी
गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री (ता.जुन्नर) येथे ‘श्री गिरिजात्मज’ गणपतीचे दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, नाशिक तसेच जुन्नर परिसरातील विविध गावांतून आलेल्या हजारो भाविक व पर्यटकांनी श्रींचे दर्शनाचा लाभ घेतला. संपूर्ण लेण्याद्री परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. संकष्टी चतुर्थीनिमित्त ‘श्री गिरिजात्मज’ गणपतीच्या मूर्तीसह मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. या सजावटीमुळे मंदिराच्या परिसराला विशेष धार्मिक आणि प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले होते. ‘श्री गिरिजात्मज’ गणपतीचे दर्शनासाठी आलेल्या भाविक व पर्यटकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.
संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी ६.१५ वाजता देवस्थानचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते ‘श्री गिरिजात्मज’ गणपतीच्या मूर्तीस विधीवत अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाविक व पर्यटकांकरीता श्रींचे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. मंदिरात सकाळी ७ वाजता, दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता श्रींची महाआरती करण्यात आली. संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक विधी आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविक व पर्यटकांना श्रींचे दर्शन सुलभतेने घेता यावे, याकरीता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर देवस्थान प्रशासनाने भर दिला. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने श्री क्षेत्र लेण्याद्री परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्त देवाचे नैवेद्याकरीता दौंड येथील विक्रम पांडुरंग दिवेकर यांनी २ कॅरेट केळींचा प्रसाद अर्पण केला. तसेच वारकरी संप्रदायाचे वै.ह.भ.प. लक्ष्मण केरू भोसले यांच्या स्मरणार्थ वारकरी संप्रदाय यांच्या वतीने भाविक भक्तांकरीता खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी श्री मुक्ताई प्रसादिक भजनी मंडळ, शिवेचीवाडी यांच्या वतीने संगीतमय भजनसेवा करण्यात आली. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर जुन्नर येथील खालचा माळीवाडा परिसरातील जय गणेश ग्रुप व के. एम. ग्रुप यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिरस आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सचिव शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांचा वाढता ओघ, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आणि महाप्रसादाच्या माध्यमातून जपली जाणारी सेवाभावाची परंपरा यामुळे संपूर्ण लेण्याद्री परिसर भक्तिमय झाला होता. भाविक व पर्यटकांना सुलभ दर्शन आणि आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थान ट्रस्टने केलेल्या नियोजनामुळे संकष्टी चतुर्थीचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. संजय ढेकणे व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.

मराठी
English
