श्री क्षेत्र लेण्याद्री येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रींचे दर्शनाकरीता भाविकांची गर्दी.
सोमवार दि.१४ जुलै २०२५ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तिर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील ‘श्री गिरीजात्मज’ गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्ताने श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थानचे अध्यक्ष ॲड.संजय ढेकणे व विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. संकष्टी चतुर्थीनिमित्त ‘श्री गिरिजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवाचे नैवेद्याकरीता गोळेगाव येथील रोहीदास मुरलीधर बिडवई यांनी २ कॅरेट केळी दिलीत. मंदिरात सकाळी ६.०० वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. संकष्टी चतुर्थीनिमीत्त देवस्थानचे वतीने दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. दिवसभर भाविकांची व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने, कर्मचारी व गोळेगाव ग्रामस्थ तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ, शिवेचीवाडी यांचे संगीत भजन झाले. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर गोळेगाव येथील देवस्थानचे विश्वस्त काशिनाथ दत्तात्रय लोखंडे, गोळेगाव येथील शुभम रत्नकांत डोके, नारायणगाव येथील सचिन पोपट रसाळ व बोरी बुद्रुक येथील रमेश जगन्नाथ जाधव यांच्यावतीने भाविकांकरीता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक व जुन्नर परिसरातुन मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने मंगळवार दि.१२/०८/२०२५ रोजी अंगारकी चतुर्थी व श्रावण मासनिमित्त ‘गणेश महायाग’ चे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होणेकरीता देवस्थानशी संपर्क साधावा. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष ॲड.संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

मराठी
English