Skip to content
Home » अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे ‘श्री गणेश महायाग’ संपन्न

अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे ‘श्री गणेश महायाग’ संपन्न

  • by

अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे ‘श्री गणेश महायाग’ संपन्न.
मंगळवार दि.०५ मे २०२६ रोजी अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील ‘श्री गिरीजात्मज’ गणपतीचे हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्ताने ‘श्री गिरीजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त देवस्थानचे वतीने ‘श्री गणेश महायाग’ चे आयोजन करण्यात आले होते.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थानचे अध्यक्ष ॲड.संजय ढेकणे, विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त ‘श्री गिरीजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवाचे नैवेदयाकरीता गोळेगाव येथील विकास सिताराम ताम्हाणे व ब्राम्हणवाडा येथील सुधीर रामदास गायकर यांनी प्रत्येकी २ कॅरेट केळी तसेच जुन्नर येथील भगत व डोके परिवार यांनी १ कॅरेट आंबे दिले. मंदिरात सकाळी ६ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. तसेच भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या. अंगारक संकष्टी चतुर्थीमुळे भाविकांची व पर्यटकांची दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. देवस्थानचे वतीने अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त ‘श्री गणेश महायाग’ चे आयोजन करण्यात आले होते. यात ४६ यजमानानी सहभाग घेतला होता. त्यांस आवश्यक असलेले साहित्य व सुविधा देवस्थानचे वतीने पुरविण्यात आल्या होत्या. सकाळी ९ वाजता दिप प्रज्वलन व गणेश पुजनाने ‘श्री गणेश महायाग’ चा प्रारंभ झाला. त्यानंतर विधीवत पुजा, होमहवन व महाआरती करण्यात आली. आलेल्या यजमानाचा देवस्थानचेवतीने श्रींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड.संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने व देवस्थानचे कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. ‘श्री गणेश महायाग’ करीता पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी तसेच देवस्थानचे कर्मचारी यांनी मोठे सहकार्य केले. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ शिवेचीवाडी यांचे संगीत भजन झाले. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर नारायणगाव येथील छाया सखाराम पारधी व सखाराम कोंडीभाऊ पारधी तसेच अकोले येथील अजिंक्य मांजुलकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष ॲड.संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.